आज्जी - एक दिवसाची पाहुणी.....
बेल वाजली...आता यावेळी कोण ? कावेरीच्य मनात विचार आला...ती किचनमधून ओरडली ,'चिनू दार उघड' ही मुलगी हातात मोबाईल घेऊन बसली होती...ती एका जागी अशी चिकटली होती...ती टस की मस झाली नाही...पुन्हा बेल वाजली....
' अहो...तुम्ही तरी उठून पहा कोण आलंय...पेपर काय पळून जाणार आहे का? 'मी पोळ्या करत आहे हो.. पट पट हलत नाहीत बाप लेक कधी...मीच धावायचं सगळीकडे....
दरवाजात एक गुटगुटीत गोऱ्यापान देखण्या आजी...उभ्या....एका हातात काठी आणि एका हातात एक कुत्र्याचे पिलू ...त्याचा पट्टा...माधव नी दार उघडल तशा त्या एकदम ओळखीचं पोटभर हसल्या...माधवराव पण न कळत हसले....' अरे ,किती वेळ दार उघडायला....???' माधवरावांना जराशा ढकलूनच आजी आत घुसल्या...
' अरे वा,सूनबाई च्या पोळ्या झालेल्या दिसतायत...छान वास सुटलाय गरम पोळीचा. .मी मस्त आता कुळथाच पिठल करते...तुला परवा सांडग्याची भाजी खायची होती ना...ती करते...सूनबाईना आज जरा आराम '
मेनू ऐकून माधवराव खुश झाले मुलगी खात नाही म्हणून हे पदार्थ हद्दपारच केले होते कावेरीनी....
पिठलं ,भाजीच्या स्वप्नातून ते क्षणात बाहेर आले....अणि ते एकदम दचकले ही कोण बाई घुसली आपल्या घरात...???
आवाज ऐकून कावेरी बाहेर आली , आजी हातातल्या कुत्र्याला कोपऱ्यात बांधत होत्या...ते पण गुमान होत...अजिबात आवाज नव्हता बेट्याचा...
' हे बघ फ्रीडम गप्प बस ,सूनबाई दमलेली असते मी तिला आता मदत करणार आहे,आपण आलो ना फिरून..आता जरा काम करू'
कावेरीला पाहून त्या म्हणाल्या ,' उशीर झाला का ग,मला यायला...पोळ्या केल्यास ना बाकी मी करते, मला फक्त डबे दाखव आताशा वयामुळे लक्षात राहत नाही...किती खपते ,राबतेस ग...बस तू आता मस्त गरम गरम झालं की बोलवेन हो तुला '
कावेरी आपल्या थकव्याला क्षणभर ही शब्दफुंकर मिळाली म्हणून सुखावली...अणि भांनावर आली ही कोण बाई अपुलकिनी का बोलतेय माझ्याशी...अणि ओळख ना पाळख एकदम स्वैपाक घरात ???
आजी सत्तर एक वर्षाच्या असाव्यात पण एकदम टूक टुकित., राहणी स्वच्छ बोलण स्पष्ट...गळ्यात सोन्याची चेन, सोन्याची अंगठी,हातात सोन्याच्या पाटल्या म्हणजे सुखवस्तू घरातील असणार....
' हे बघ मी येताना सांडगे ,कुळीथ पीठ आणलाय मला माहित होत घरात नसेल...चल दाखवते ना...डबे...?'
आता चिनू भानावर आली,कानातील खुंट्या काढल्या तिनी अणि पाहिलं तर आई बाबा भांबावून गेलेत...एक मस्त गोड आज्जी पदर खोचून उभी आहे ...अणि खुर्चीला एक मस्त पप्पी बांधला आहे...
आई बाबा खाणाखुणा करताना पाहून तीनीच जोरात विचारलं,' आई कोण ग ही आजी...माझी आजी का?'wow आणि हा मस्त भुबड्या मला आणला का?'
' गप ग कार्टे तुझ काहीतरी भलतचं..गप बस जरा '
माधवराव मग पुढे आले ,' आजी कोण तुम्ही? ' तुम्ही घर चुकलात का? कोणाकडे जायचय तुम्हाला ? '
' आजींनी हातातली काठी पाठीत घालती अरे कार्ट्या स्वतःच्या आईला हे प्रश्न विचारतो?' मला आजी म्हणतोय ?'
माधवराव चांगले कळवळले...
कावेरी हा लट्ठी प्रहार पाहून गप बसली....,' चल ग डबे दाखव मला ...भाजी पिठलं करते...भाताचा कुकर लाव..छोटी तू मोबाईल बाजूला ठेव...घरातला हा पसारा आवर आणि फ्रीडम ला दूध दे ,देवापाशी दिवा लाव, शुंभ करोति म्हण ..चल .. अटप..आठवतेय शिकवलेली लहानपणी '
फ्रीडम शी खेळता येणार म्हणून चिनू पटापट सगळ्याला तयार झाली...प्रत्येक गोष्टीला खळ खळ करणारी ही पोरगी सुता सारखी सरळ झालेली बघून कावेरी माधव...प्रचंड धक्यातून जात होते...
काय चाललय हे दोघांना सुधारत नव्हत...सूनबाई अशी खणखणीत हाक ऐकू आल्यावर कावेरी धूम किचन मध्ये पळाली...
मुलगी अणि बायको यांची अशा तंतरलेली पाहून माधवच्या मनात गाणी रूणूझुणी लागली...
डबे दाखवून कावेरी बाहेर आली...,
' अहो, काय हो..तुमचे अनेक मानलेले भाऊ बहिण आहेत तशी ही आई नाही ना मानलेली ? '
' गप ग,तुझ्या जिभेला काही हाड..वाटेल ते बोलू नको '
' पटकन पोलिसांना फोन करू..या लोकांची टोळी असेल..आधी ही म्हातारी येईल..जेवणातून आपल्याला काही तरी खायला घालेल...मग त्याची टोळी येऊन आपल्याला लुटून जाईल .'
' अग खरच बघ ना किती हीपनोटाईज केलंय आपल्याला..हक्क..काळजी..गोडवा वापरून कस आपल्याला झाशात घेतल ग ? '
' बघा ना मी बाहेर अणि आजी आता स्वैपाक करतेय काय म्हणावं याला...'
' तुम्ही पटकन फोन लावां हो पोलिसांना '
माधवराव मोबाईल वरून फोन लावत होते तेवढ्यात किचन मधुन मस्त पीठल भाजीचा सुवास आला...
' जेवून मग लावू का फोन? '
' काय बोलताय ?जेवायला उद्या ताट पण उरणार नाहीत घरात '
तितक्यात आजी काठी टेकत आली...' चला रे मुलांनो, छोटी चल तू पण '
भाजीचे नखरे करणारी चिनू मस्त पिठलं पोळी खायला तयार झाली...
कावेरी अणि माधव आता खूप घाबरले अन्नातून गुंगीच औषध दिलं तर...
' आई आधी तुम्ही जेवा..आम्ही बसतो नंतर '
माधवराव कावेरीवर खुश झाले किती हुशार ती माझी बायडी..असे भाव चेहऱ्यावर होते...
आजी पण म्हणाली,' ठिक...मी जेवते मग तुम्हाला वाढते...:
' हुश्य...या जेवणार म्हणजे अन्नात काही नाही हे नक्की '
कावेरी माधवरावांच्या कानात कुजबुजली...
आजी आणि चिनू मस्त गप्पा मारत जेबत होत्या..चिनू शाळेच्या गंमती सांगत होती आजी फ्रीडम च्य्या मज्जा सांगत होती...
हे दृश्य कावेरी माधव डोळ्यात साठवत होते..नाहीतर रोजच जेवण टीव्ही समोर होत असे...
यांची जेवण चालू होती तोवर माधव नी पो. स्टे. ला फोन लावला आणि सगळा इतिहास सांगितला...' पोलीस शांतपणे म्हणाला ,फोटो पाठवतो तुमच्या मोबाईल वर तो या आज्जी चा असेल तर निश्चिंत रहा... नंबर सांगा तुमचा ..फोटो send करतो...आजी जाईल थोड्यावेळाने ..ती गेली की मग फोन करा परत...'
घरी आलेली आजी अणि फोटोमधली आजी एकच होती...पण स्वतः पोलिसांनी ग्वाही दिली त्यामुळे..दोघं जरा निर्धास्त झाले....
आजी आणि चिनुच जेवण आटपल..आजींनी दोघांना मायेनी आग्रह करून जेवायला वाढलं...वेगळी चव म्हणून माधव आणि जरा आयत मिळालं म्हणून कावेरी दोघं मस्त आडवा हात मारून जेवले....
अवरा अवरी करण्यात आजीला चिनू पण मदत करत होती..आजी हे बघ आजी ते सांग..आजी हे माहीत आहे..ते सांगू करून तिच्या मागे मागे करत होती....
आज एका आज्जी मुळे घरात सगळ बदलून गेलं होत...
१० वाजत आले होते..आजी एकदम उठली आणि म्हणाली, ' फ्रीडम च्या गळ्यात एक पत्ता आहे मला तिथे सोड रे .urgent जायचं आहे '
पत्ता जवळचा होता...कावेरी चिनू सगळेच आजीला कार मधून सोडायला निघाले...आजीची काठी धरून चालणारी चिनू अणि मागे उड्या मारणारा फ्रीडम मस्त एक फोटो कावेरीनी काढला...
एका मोठ्या बंगल्यापाशी गाडी थांबली आजी उतरली..एक गोड हसू देऊन निघाली...तितक्यात बंगल्यातून एक मध्यंम वयाची मुलगी आली...' तुमच्या कडे होती का...काही त्रास दिला नाही ना '
' नाही हो उलट पाठवत जा अधून मधुन..'
' बोलवून नाही पण मध्येच येतील सुध्दा त्या कधीतरी '
त्यांचं त्यांचं जग शोधायला पडतात बाहेर..अस गहन काहीतरी बोलून ती मुलगी आत गेली...
दोन तीन तास कसे मंतरलेले गेले होते माधव कावेरीचे...पण आजी बद्दल उस्तुकता खूप होती...इतक्या रात्री नको सकाळी पो. स्टे. ला फोन करू अस ठरलं...
सकाळी ९ वाजता माधवरावानी चौकीत फोन लावला...आणि कालच्या आजी बद्दल विचारल...पोलीस चौकी मधुन जे कळले ते ऐकून माधवराव कावेरी अवाक झाले..
आजीच पूर्ण नाव...श्रीमती. सुधा गोखले...एकेकाळी युनिव्हर्सिटीच्या hod...एकच मुलगा तो शिकून परदेशी स्थाईक... ईकडची नाळ तोडली नव्हती...पण इकडे रमायचा पण नाही..आणि आजी ना परदेशी करमायच नाही...वैधव्य लवकर आलं पण नोकरी,मुलगा यात जाणवलं नाही पण काही काळानं त्यांना एकटेपणा जाणवू लागला... वाचन,बाग काम, योगा यात गुंतवून पण माणसांची सोबत कमी होती...यातून आजीच्या मनावर ताण येऊन परिणाम व्हायला लागला...आजी random उठून कुणाकडे जाऊ लागल्या...काही भली माणसं समजून घेतात काही हकलून देतात...
घरच्या आजी ना सांभाळणाऱ्या मावशींनी आजीच्या लेकाच्या कानावर घातलं...मग मुलानी बरेच उपाय केले पण फरक पडत नव्हता...dr म्हणाले त्यांना सोबत हवी आहे सतत कुणाची तरी...मुलगा इकडे कायमच येणं शक्य नव्हत..त्यांनी नात्यातली दोन विधवा बायकांवर नी.जबाबदारी सोपवली...एक कुणीतरी आजी सोबत असते आजी कुणाकडे गेली.याचा ती बाई आधीच रिपोर्ट आम्हाला करून जाते.आजी कुणाच्या घरी घुसतात अणि घर सुसंस्कृत आहे ना याची नोंद ठेवायची इतकंच काम त्या बाईंच आहे..आजी ठराविक परिघातात फिरतात..मग एखाद्या घरून आम्हाला फोन येतोच...आम्हाला कल्पना असतेच...
पण आजवर आजींनी ना कधी कुणाला इजा पोचवली ना आजीना कुणी... आत दबलेल्या मायेनी प्रेमानी त्या जिंकतात सगळ्यांना...एकदा त्या पो.स्टे. ला येऊन पण आमची शाळा घेऊन गेल्या आहेत...आमची आजी झाल्या आहेत...
एक माणुसकी म्हणून आम्ही पण त्यांची काळजी घेतो...
सगळ ऐकून कावेरी च्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत...एक दिवस भेटून गेलेली आई, सासू आणि आजी.त्यांना कायमच लक्षात राहणार होती...
माधवरावांनी चिनू,आजी आणि फ्रीडम चा काढलेला फोटो फ्रेम करून भिंतीवर लावून घेतला..कदाचित ती परत आली तर तिला आपल्याच घरी आल्यासारखं वाटेल...
रमा माझे पान या facebook page वरून
मोक्ष - ---सचिन श देशपांडे
नमस्कार... मी मुग्धा... मुग्धा सबनिस. अगदी जेम्स बाँड सारखं ईन्ट्रोडक्शन वाटलं का? हा हा हा... पण मी अन् माझा नवरा, जेम्स बाँड पेक्षा कमी नाहियोत हा. किती संकटांना तोंड देत... नाना क्लुप्त्या लढवत... एकमेकांशी लग्न केलं आम्ही. नाना क्लुप्त्या म्हणजे खरंतर, 'नानां'च्या क्लुप्त्या... आणि त्यांना साथ 'नानीं'ची. थोड्यावेळाने येते नाना - नानींपाशी... तुर्तास आमचं 'एकमेकांना बघणं - एकमेकांना गटवणं - एकमेकांना पळवणं - एकमेकांना लग्नाच्या गाठीत बांधणं' हे व्हाॅयेज बघुयात.
तर मी पुर्वाश्रमीचीही मुग्धाच... फक्त मुग्धा अय्यंगार. कर्मठ दक्षिण भारतीय कुटुंबातील, एकुलती एक लाडा - कोडात वाढलेली मुलगी. नव्वद साली वैगरे आलो आम्ही डोंबिवलीहून, मुलुंडला या आमच्या 'सुख सहवास' बिल्डिंगमध्ये रहायला... मी पाच वर्षांची होते. स्टेट बँक आॅफ ईंडियाची बिल्डिंग होती... त्यामुळे सगळीच मोठी लोकं, एकमेकांना ओळखत होती. सबनिसांची फॅमिली ऐंशी सालापासूनच रहात होती बिल्डिंगमध्ये... ईनफॅक्ट बेसीक गोष्टी सुरु झाल्यावर, बिल्डिंगमध्ये पहिले रहायला आलेले तेच होते... सागर दोन वर्षांचा होता तेव्हा. पहिल्या दिवशी मी खेळायला गेले, तर फुल रॅगिंगच माझं. "जा ह्या ताईला हे आणून दे... जा ह्या दादाला हे घेऊन ये". तेव्हा सागर ऊभा होता त्या घोळक्यातच शांत. मी धावपळ करुन दमले, नी लागले रडायला... तशी सागरने पिटाळलं सगळ्या पोरांना, त्यांच्या त्यांच्या घरी... नी आला माझ्याजवळ. खिशातून रुमाल दिला मला चोळामोळा झालेला. मी डोळे पुसले नी, घडी घालून दिला त्याला तो परत. पण खरं सांगू... it was a love at first sight... अर्थात त्याच्याकडून... हे त्यानेच सांगितलं होतं नंतर. नाहितर पाचव्या वर्षी मला फत्रे कुठे कळायला, लव्ह नी शव्ह. "मला दादा बिदा म्हणायचं नाही हा"... एवढं बोलून तो निघून गेला होता.
असेच दिवस भराभ्भर सरत गेले... अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसे... कॅलेंडरची पानं ऊलटली जावीत... किंवा घड्याळाचे काटे गरागर फिरावेत... तसे. सागर बँगलोरहून हाॅटेल मॅनेजमेन्ट करुन... वर्षभर 'शेरेटाॅन ग्रँड' मध्ये काम करुन आला... पंचवीस वर्षांचा ताड माड घोडा बनून. मी माझ्या काॅलेजच्या... आणि सी. एस. च्या अभ्यासात, पुर्ण गुंतले होते. तीन वर्ष अगदी ईमाने ईतबारे थांबला तो. मी माझं शिक्षण पुर्ण केलं... आणि एके दुपारी सागरने मला, तो काम करत असलेल्या 'ओबेराॅय' मध्ये बोलावलं. तिकडे त्याने त्याला काय काय काम करावं लागतं, ते सच्चेपणाने सांगितलं... स्वतःचं रेस्टाॅरन्ट सुरु करायचं, त्याचं स्वप्नही सांगितलं... आणि प्रपोज केलं त्याने मला. एकतर जातीतला नाही... शिवाय करिअर अधांतरीच... मला खात्री होती की माझे आई - वडिल नाहिच म्हणणार. "We want an Iyengar" करत बसणार. मग मीच म्हणाले सागरला... "तुला विश्वास आहे तू जे काय स्वप्न बघितलंयस, ते पुर्ण करु शकतोस?... आणि हा विश्वास शंभर टक्केच हवा बरं का... कारण मी ज्याच्याबरोबर पळून जाईन, त्याने एका टक्क्यानेही टेन्टेटीव्ह असणं, मला परवडणार नाही". सागरने दोन्ही दंड पकडले माझे, नी जवळ खेचलं मला... आणि म्हणाला... "Dont under estimate me Mugdha... १०० नाही २०० टक्के खात्री आहे मला, की मी माझं स्वप्न पुर्ण करेनच".
मग एके सकाळी आम्ही पळालो... आणि ईथे आमच्या मदतीला धाऊन आले होते, नाना - नानी. रामचंद्र शारंगपाणी आणि जानकी शारंगपाणी... तेव्हाचं वयवर्ष अनुक्रमे सत्तर नी पासष्ठ... मुल - बाळ नसलेले. त्यांच्या शेजारच्या कृपलानींची मुलं, त्यांना नाना - नानी बोलू लागली.. नी मग हळूहळू अख्खी बिल्डिंगही. हे दोघंच होते आम्हा दोघांबरोबर देवळात, आमचं लग्न लाऊन द्यायला. नंतर ह्यांच्याच तळेगावच्या बंगल्यात, परस्पर रहायला गेलो होतो आम्ही... पण अर्थात हे दोनेक दिवसच ठीक होतं. कारण सागर काय किंवा माझं काय... सगळं नोकरी वैगरे ईथेच होतं. आणि आम्ही "हमने घर छोडा है.. रस्मोंको तोडा है" वैगरे म्हणत... मिळेल त्या ट्रकमधून जाणारे, ईम्मॅच्युअर्ड प्रेमी नव्हतो. त्यामुळे आपापल्या काम - धंद्यावर परतणं, अगदीच जरुरी होतं. आणि त्यामुळेच नाना - नानींवर येऊन पडली होती... ही अवघड जबाबदारी, आम्हा दोघांच्याही घरच्यांना मनवण्याची.
स्टेट बँकेतून DGM म्हणून रिटायर्ड झालेल्या नानांना... आणि एका साऊथ बाॅम्बेच्या प्रतिथयश काॅलेजमधून, प्रिन्सिपाॅल म्हणून रिटायर्ड झालेल्या नानीला... अर्थातच या प्रंचंड बुद्धिवादी अशा जोडप्याला, अजिबातच कठिण नव्हतं आणि ते. खरंतर आधीही आमच्या घरी कल्पना देऊन, त्यांची संमती मिळवणं सोप्प होतं नाना - नानींसाठी. पण आयुष्य ईतकं सोप्प कधीच नसतं, हे माहिती होतं दोघांनाही... त्यामुळे ईतकी महत्वाची गोष्ट, आम्हाला ईतक्या विनासायास मिळणं नको होतं दोघांनाही. आणि म्हणुनच आम्हाला जोखायचं होतं त्यांना... आमचा एकमेकांवर एकमेकांबरोबर पळून जाण्याएवढा विश्वास आहे का?... हे बघायचं होतं त्यांना. म्हणून मग आम्ही दोघांनी घरातून कामासाठी बाहेर पडायचं... वाटेत नानांच्या मित्राघरी आम्ही दोघांनी तयार व्हायचं... मग मंदिरात लग्न... तिथून थेट तळेगाव... तळेगावहून आपापल्या घरी फोन... मग त्या रात्रीच नाना - नानींनी बिल्डिंगमध्ये परतायचं... हे सगळं नानांच्या प्लॅनबरहुकूम घडलं. नानांच्या हाताखाली कधिनाकधी काम केलेल्या आम्हा दोघांच्याही वडिलांना, शक्यच नव्हतं मग नानांचं न ऐकणं. अशा तर्हेने नाना - नानींनी 'मिशन मनधरणी' यशस्वी पार पाडूनच, आम्हा दोघांना परत बोलावलं.
मग दुसर्या दिवशी फटाक्यांनीच आमचं स्वागत करण्यात आलं होतं. छानसा मुहुर्त काढून... दोन्ही पद्धतींनी आमचं लग्न करण्यात आलं होतं. माझं 'कन्यादानम' करण्याचं पुण्यकामही मग, नाना - नानींनाच करण्यास सांगण्यात आलं... अगदी स्वेच्छेने माझ्या आई - वडिलांकडून. तो विधी करतेवेळी नानांच्या मांडीवर बसले होते मी, तेव्हा ढसाढसा रडले होते नाना. मला आठवलं होतं नानींनी सांगितलेलं आम्हाला... त्यांच्या सख्ख्या एकुलत्या एक लेकीने केलेल्या आत्महत्येबद्दल, जेव्हा तिच्या आंतरजातीय लग्न करण्याला कडक विरोध केला होता नानांनी. त्यांनी त्यांच्या लेकीवर केलेल्या अन्यायातून... माझ्या कन्यादानमाद्वारे, नाना ऊतराई होऊ पहात होते बहूदा. त्या रात्री मग नाना - नानींच्या फ्लॅटमध्येच राहिलो होतो आम्ही दोघं. "अरे आता जा निजायला" या त्या दोघांच्याही सांगण्याकडे दुर्लक्ष करत, रात्रभर जागून गप्पा मारल्या होत्या आम्ही चौघांनी... पुर्वीचे दिवस आठवत.
ऊन्हाळा आला की नानी, वाळवणाचे सर्व पदार्थ करत असत घरीच... आणि गच्चीवर वाळायला ठेवत असत मग त्या, ते सारे पदार्थ. आणि राखणीला बसवत आम्हा लहान मुलांना... पण नावालाच. हो... कारण स्वतःच सांगत त्या की, "कुठल्याही कावळ्याला ऊडवू नका हो... खाऊद्या त्याला जेवढं खायचंय". त्यांच्या लेकीला खूप आवडत असत, हे वाळवणातील पदार्थ. तिच येते कावळ्याच्या रुपात, असा ठाम समज होता नानींचा. आम्हाला हसूच यायचं त्यावेळी... पण आता... आता पटलंय मला ते. नाना आणि नानी दोघेही एकाच दिवशी गेले, सहा महिन्यांपुर्वी. आयुष्यभर एकत्र जगलेले... फक्त एकमेकांकरताच जगलेले... ते राहणार तरी कसे होते एकमेकांशिवाय? सवाष्ण गेल्या नानी... नी अवघ्या काही तासांत नानाही. सागरनेच ठामपणे सांगितलं होतं मला की, "तुझं कन्यादान त्यांनी केलं... तुला कायम त्यांची गेलेली मुलगी समजत आले ते... त्यामुळे त्या दोघांनाही अग्नी तुच दिला पाहिजेस... तुझ्या हस्तेच त्यांना 'मोक्ष' मिळायला हवा... मी तुझा नवरा तुझ्यापाठी खमकेपणाने ऊभा आहे... तुला कोणीही काहीही बोलणार नाही". आणि मग दिला होता दोघांनाही मीच अग्नी.
नानींनीच शिकवल्याप्रमाणे घरी सगळं करुन... जेव्हा मी गच्चीवर वाळवण टाकून निघतच होते काल... तीन कावळे अचानक कुठुनसे येऊन, वाळवणाच्या चादरीवर बसले. त्यांतील फक्त एकानेच, एक चिकोडी ऊचलली... आणि बाकी दोघं नुसतं बघत होते ईकडे - तिकडे. त्या एका कावळ्याचं खाऊन झाल्यावर... तीन्ही कावळे ऊडून गेले होते, एकाच दिशेने... मागे - पुढे. आणि त्यातला एक कावळा तर अगदी माझ्या डोक्यावरुन... त्याच्या पंखांची हवा लागली केसांना माझ्या, ईतक्या जवळून. आणि आठवलं मला सागरने सांगितलेलं, काही दिवसांपुर्वी... त्याच्या हाॅटेलच्या समोरच्या कट्ट्यावर, अगदी रोज ठरल्यावेळी थोड्यावेळाकरीता येऊन बसणार्या... त्या तीन कावळ्यांबद्दल. अगदी त्या दिवसापासूनच... जेव्हा भाड्याने चालवायला घेतलेलं हाॅटेल, विकत घेतलं होतं सागरने... प्रचंड मेहनत करुन. आणि पुर्ती केली होती, बघितलेल्या स्वप्नाची त्याच्या... मला आणि नाना - नानींना दिलेला शब्द पाळून.
म्हणूनच म्हंटलं... आता पटलंय मला, ते नानींचं कावळ्याला ऊडवून न देण्यामागचं कारण.
--- --------- सचिन श देशपांडे
माझे पान या facebook page वरून