आमचा मुलुंड पूर्वेचा एरिया म्हणजे अतिशय शांत. अगदी काळं कुत्रं पण भुंकायला यायचा नाही 10 वर्षापूर्वी. हळूहळू रस्ता झाला. नवीन बिल्डींग्स आल्या आणि वर्दळ वाढू लागली. शांतता ,पक्ष्यांची कुजबुज ऐकू येईनाशी झाली.
नवीन मोठे कॉम्प्लेक्स झाले त्यात विविध सण साजरे करूनच लोक एकत्र येऊ लागले. आणि त्यात अटळ बनला आवाज !!!.आवाजाशिवाय आणि त्याच्या तालावर नाचल्याशिवाय कुठला सण साजरा करता येऊच शकत नाही अशा नवं -विचारांनी भारलेली पिढी जोमात काम करू लागली. शिव जयंती, दही-हंडी, पूजेचे कार्यक्रम,गणपती, नवरात्री, 25 डिसेंबर, 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, लग्न, मुंज,बारसं, वाढदिवस , जयंत्या. मला वाटत 365 दिवस भरतीलच. पण सण-उत्सव संपणार नाहीत. थोडक्यात काय आवाज असेल 'तिथेच' आमची संस्कृती-परंपरा पाळण्याचा आम्हाला फील येतो.!! शांततेत कार्यक्रम म्हणजे 2 मिनिटांचे सुतक किंवा मयत-सभा. ती दोन मिनिटे आम्हाला जीवावर येतात. पण आमची संस्कृती असावी अस बळेबळे मानून गप्प राहायचा प्रयत्न करतो. या मौनात हि आवाजाला स्कोप असेल तर शोधून काढतीलच. आणि कालानुरूप बदल करून परंपरा पाळण्याचे पुण्य पदरात पडून घेतील.
परवा येताना एक होर्डिंग दिसले. "सॅल्यूट to आर्मी" आणि त्यावर सत्ताधारी 'पक्ष्यां'चे फोटू.!! वाटलं काहीतरी वेगळा कार्यक्रम असावा समोरच्या घाणीतल्या मैदानात. आर्मी च्या कार्यक्रमाला शोभेल अशा "युद्ध" पातळीवर काम चालू झाले. दोन दिवसात चिखलमय जमिनीवर फ्लोरिंग आले. स्टेज बांधले. इन्व्हर्टर वॅन आल्या, बुलडोझर आणून फटाफट 2/3 वर्षांपासून तिथे लोक प्रतिसादातून जगवत असलेली झाडे धराशायी केली गेली. म्हटलं जाऊ दे, आपल्या आर्मी लोकांच्या कार्यक्रमासाठी तेवढा त्याग तर आपण करायलाच पाहिजे. झाड काय दर वर्षीच लावायची असतात. संख्या नको का वाढायला वृक्ष-लागवड केली ते सांगताना?.
नंतर बाजूला हळूच एक होर्डिंग लागले. तीन दिवस दांडिया: 'सौजन्य' येथील स्थानिक आमदाराच्या मुलाचे. त्याचे हि बरोबरच !! तो तरी कुठे जाणार 'वडिलोपार्जित जागा' सोडून खेळायला ? पण संदर्भ काही लागत नव्हता. दांडिया खेळून आर्मी च्या लोकांना सॅल्यूट कसे करणार? म्हटलं असो, टिपरी खेळाचा नवीन अविष्कार मिळेल बघायला. एक हाताने टिपरी समोरच्या टिपरीवर आणि दुसरा हात कपाळाला लावून सॅल्यूट . हल्ली फारच creativity वाढलीये. पण जुन्या खोडांना आताशा हे सार समजून घ्यायला पार मुळाशी जावं लागत. हे खरंच.
आणि तो सुदिन उगवला. संध्याकाळी 6.30 ला च DJ मिक्सर तयार झाले आणि जोमाने वाजू लागले. घरातली खिडक्यांची तावदाने त्याच तालावर नाचू लागली. मधेच वरच्या कपाटाचा दरवाजा बेशिस्त होऊन उघडला. काही कळलेच नाही. घरातील आजोबांना ‘अस्वस्थ’ वाटू लागले. म्हणाले मोबाइल वरच्या खिशात vibrator वर ठेवल्यासारखे वाटतेय. सगळॆच हादरू लागले. आम्ही 'स्वस्थ' विचार करू लागलो. काय बरे करता येईल?
संध्या रानडे
ऑपशन्स बरेच होते. कानात बोळे घालणे, खिडक्या दरवाजे घट्ट बंद करणे, घरातली काम-धाम सोडून, मुलांचे परीक्षेचे अभ्यास सोडून बाहेर मोकळ्या हवेत 4/5 तास फिरायला जाणे, T .V चा गळा बंद ठेवून हलत्या चित्रांची मजा घेणे, घरच्यांनी मिळून डम शराड खेळणे ,समोर जाऊन 'शांतपणे' दांडिया खेळणे. मग लक्षात येऊ लागलं कि ह्यातलं आपण काहीच करू शकत नाही. म्हणून अंदाज घेत बाहेर लोक काय करतायत ते बघू लागलो. आमच्या सोसायटीत युथ टीम ला काळजी पडली होती कि आता 'आपला आवाज' कसा ऐकायला जाणार सगळ्यांना? त्यावर गांभीर्याने चर्चा होत असावी. शेजारी हसत खेळतं बोलत होते. म्हटलं, तुमच्या घरात खिडक्या हालत नाहीयेत का? म्हणाले, "हो तर हलतायत ना? पण सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आहे तेव्हा आपण त्यात आनंदाने सहभागी नको का व्हायला.? चालायचंच".
थोडक्यात आजूबाजूला अशी "चालक"मंडळी निर्वेधपणे जीवनाची गाडी "चालसे" पटरीवरून हाकत होते.
आम्ही आपले उगाच सैरभैरल्या सारखे.!! शेवटी विचार करून खाली उतरलो. समोर ढीगभर पोलीस वॅन. म्हटलं, आपल्या ह्या मित्राबरोबर share करावे मनातले. तर तो दीनवाणे होऊन म्हणाला ,"अहो मी जाऊन सांगितले कि हा आवाज खूप मोठा आहे. पण ते ऐकत नाहीत, तुम्ही मोर्चा घेऊन येता का?"
आम्ही म्हटलं ,"मोर्चा ? का? आता एकट्याचा आवाज कुणापर्यंत हि पोचत नाही का?" त्याने ,कोणाशी बोलत आहोत आपण, असा चेहरा करून बोट दाखवले, "त्यांना सांगा." समोरच्या साहेबांकडे गेलो ते म्हणाले ,‘कुठे राहता ,काय नाव आपले?’. धाडस करून मित्राला सांगितले कि नाव,गाव!! मग म्हटले, चला, मित्र काम करणार तर आपलं.! म्हणून उत्साहात सांगितले कि हा आवाज नैसर्गिक कानांच्या ऐकण्याच्या शक्तीच्या पलीकडे जात आहे. ते म्हणाले, “हो कि राव.!! अगदी खरं पण आपण काय करणार? तुम्ही ना,100 नंबर वर कॉल करून तक्रार नोंदवा. तुमचं नक्की ऐकतील.” आम्ही संभ्रमात.! प्रत्यक्ष तिथे असलेली मित्र-मंडळी ह्या पेक्षा जास्त काहीही करू शकत नव्हती. सगळ्यांनाच आभासी जगात राहायची गोडी लागलीये तर. आम्ही आयोजकांकडे जात विचार करू लागलो कि आता 100 नंबर फिरवलाय, त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलय किंवा त्यांना ऐकू गेलय म्हणणं बरोबर ठरेल आणि लगेच इकडचा आवाज 1 वर . किती सुंदर जग आहे नाही हे?
'सौजन्यमूर्ती' आले समोर बोलायला. कामातून वेळ काढून, कानातला earplug मात्र तसाच.! कानाला चिकटलेली, जणू ‘कर्णा’ची कवचकुंडलेच!! जन्मतःच मिळालीत ह्या पिढीला.!!! आम्ही भीतभीत म्हणजे आमच्या ‘लौकिकाला साजेशा’आवाजात बोलू लागलो. आमचे ऐकायला येत नसल्याने सौजन्यमूर्तींनी DJ वाल्याला हाताने खूण केली. आणि आवाज एकदम बंद. आम्ही आनंदलो चला 5 मिनिटे तरी कान विश्रांती घेतील. त्यांना अडचण सांगितली समजावून. फारच लागले त्यांना!! म्हणाले, "हे असं असतं तुमचं, एकी नाही,समजून घ्यायला नको तुम्हाला.!! वर्षातले 3 दिवस आम्ही बिचारी आमचा कामाचा शीण घालवतो तर तुम्हाला नकोय. आपल्या सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे तुमच्या सारखे लोक मोडता घालतात." हे सारं त्यांनी इतक्या प्रेमळ आणि स्नेहपूर्ण आवाजात ऐकवलं कि आम्ही दिग्मूढ झालो. धन्य, भरून पावलो.!! काय ते मार्दव , समजावण्याचे मधाळ शब्द. सौजन्य शब्दाचे मूर्तिमंत उदाहरणच म्हणा की.!!!!!! आमची काय बिशाद पुढे बोलायची. तसं देखील आमचे ऐकून घेतल्यासारखे केले ह्यातच सारे आले. म्हटलं, "उद्या पासून आम्ही पण येऊ कि खेळायला पण जरा आवाजाचं बघा बुवा." आमचा बोलण्याचा आवाज हळू हळू कमी होत गेला. आणि नंतर फुटतोय कि नाही आम्हालाच शंका येऊ लागली.
आज आणि उद्या अजून दोन दिवस हे चालेल. मग परत आमचा बंद झालेला आवाज सुटेल असं वाटतंय. बघू.
विनोद बाजूला ठेवू. पण एक सांगायला जरूर आवडेल कि आमच्या ह्या धाडसाने तिकडचा आवाज 5 वरून 3 वर नक्कीच आलाय, शिवाय कोर्टाने 10 वाजता कार्यक्रम बंद करायचा आदेश हि सौजन्यमूर्तींनी पाळलाय किमान काल तरी. हे बघून आशा ठेवायला हरकत नाही.
पण सामान्य लोक घटना झाल्यानंतर जसे एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवतात तसे आधीच जागरूक होऊन एकत्र का येऊ शकत नाहीत? स्वतःचा आतला आवाज कोणाला ऐकू येत नाही का?
संध्या रानडे.